[ad_1]
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत महापत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवल्याने एकनाथ शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ठाकरे गटाने निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून दुसरीकडे शिंदे गटही हायकोर्टात पोहोचला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता थेट शिंदे गटाला आव्हान दिलं असून, जाहीर पाठिंबा देऊ असंही म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
“आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंधे गट हायकोर्टात गेला आहे. जर त्यांनाही आपल्याला न्याय मिळालेला नाही असं वाटत असेल तर राज्यरपालांना विनंती आहे त्यांनी अधिवेशन बोलवावं. आणि मिंध्यांना सांगतो; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना!,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“आता तरी न्याय मिळाला पाहिजे. माझं तर आव्हान आहे की राहुल नार्वेकर, मिंधे यांनी एकही पोलीस सोबत न आणता माझ्यासह जनतेत येऊन उभं राहावं. मीदेखील एकही पोलीस सोबत घेणार नाही. तिथे नार्वेकरांनी शिवसेना कोणाची आहे ते सांगावं. त्यानंतर जनतेने कोणाला पुरावा, गाढावा किंवा तुडवावा हे ठरवावं,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
‘चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही’
पुढे ते म्हणाले की, “व्हीप आमचाच आहे. व्हीपचा अर्थ आहे चाबूक! चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो!”. आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे. आपण शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत, म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपलंय का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
‘अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल’
“मला सत्तेचा मोह नव्हता; एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं! आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार, की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार; हे पाहण्याची ही लढाई आहे! सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार! आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल; ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन! पण लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही?,” असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
“कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं; पण प्रत्यक्ष अमलात आणतो जल्लाद! त्या जल्लादाचं काम ह्या लवादाला दिलं होतं! सुप्रीम कोर्टाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो; ह्यांना फाशी कशी देऊ? ह्यांच्या जन्माचा दाखलाच नाही.पण कोर्टाने जन्माचा दाखला तपासण्यास नाही तर, जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं!,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही’
“सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार, हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो; तर लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले; त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली! लोकशाहीच्या हत्याऱ्यांना माहीत नाही; महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही, तिथल्या तिथे गाडून टाकते,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
‘मोदींना पाठिंबा देण्यासाठी कशाला बोलावलं?’
1999 मध्ये दिलेलं संविधान शेवटचं असेल असं मानायचं झालं तर 2014 मध्ये मला काय म्हणून मोदींना पाठिंबा देण्यासाठी बोलावलं होतं? माझी सही कशाला घेतली होती? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी सल्लामसलत करण्यासाठी उद्धव ठाकरेंशी बोलतो असं सांगितलं होतं. मग ते कशासाठी बोलले होते? असंही ते म्हणाले.
मी कोणीच नव्हतो तर माझ्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षं मुख्यमंत्रीपद कोणाच्या पाठीवर उबवलं? मिंधेंना पंदं कोणी दिली? मी तुला पदं, एबी फॉर्म, मंत्रीपदं दिली होती की नव्हती? अशी विचारणा करताना पंचतारांकित शेती आणि हेलिपॅड असणारा घरगडी पाहिला नाही असा टोलाही लगावला.
[ad_2]